सोलापूर : दामाजी कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कारखान्याने गेल्या ६२ दिवसांत दोन लाख मे. टन गाळप यशस्वीरित्या पूर्ण केले आहे अशी माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. यंदाच्या हंगामात चार लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चितच पार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखान्याला प्रशांत परिचारक, भगीरथ भालके यांचे सहकार्य शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख यांचे आर्थिक सहकार्य होत आहे असे त्यांनी सांगितले.
चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने प्रती टन २७०१ रुपये यांप्रमाणे ऊस बिल पुरवठादार, सभासद, शेतकऱ्यांच्या सोयीनुसार यापूर्वीच संबंधित बँका, पतसंस्थांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला आहे. डिसेंबर २०२३ च्या पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल लवकरच जमा केले जाणार आहे. ऊस तोडणीसाठी सहा हार्वेस्टिंग मशीन, १३५ ट्रॅक्टर, १२५ डम्पिंग ट्रॅक्टर, १०० बैलगाड्या कार्यरत आहेत. हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे उसाच्या टनेजमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्यानंतर कारखान्याचे गाळप बंद केले जाईल असे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले.