पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. कारखान्याचे संचालक मंडळ मनमानी पद्धतीने काम करत आहे. कारखान्याने सभासदांच्या आडसाली उसाचे तातडीने गाळप न केल्यास ९ जानेवारीला काटा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हलगी मोर्चा काढला. कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी ३२०० रुपये उचल द्यावी, तुटून गेलेल्या उसाला तीन महिने झाले तरी पैसे न दिल्याने ते पैसे व्याजासह द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कारखान्याने ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष व संचालक रंजन तावरे, अॅड. जी. बी. गावडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. कारखाना लवकर ऊस तोडणी करत नाही. त्यामुळे टनेज कमी भरते. तसेच गहू व हरभरा पीक घेता आले नाही, असा आरोप सभासद शशिकांत तावरे यांनी केला. तर रंजन तावरे म्हणाले की, कारखान्याचे संचालक मंडळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. संचालक मंडळाचे चुकीचे कामकाज त्यांनी रोखावे. त्यांना चांगले काम करण्याची सूचना उपमुख्यमंत्री यांनी द्यावी. यावेळी संदीप चोपडे, रोहन कोकरे, अॅड. श्याम कोकरे, डी. डी. जगताप, विकास जगताप, नितीन देवकाते, सोपान देवकाते, राजाभाऊ देवकाते, युवराज तावरे आदींनी संचालक मंडळावर जोरदार टीका केली.