पुणे : राज्यभरात ऊस तोडणी हंगामाला गती आली आहे. तोडणी मजूर मुलाबाळांसह साखर कारखान्यांच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुलांसाठीच्या साखर शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ऊस तोड कामगारांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. आम्ही मोलमजुरी करून जीवन जगत असलो तरी सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी कैफियत ऊसतोड कामगार मांडताना दिसत आहेत.
स्थलांतरीत ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीच्या ठिकाणी मुलाबाळांना घेऊन राहातात. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरू केल्या जातात. मात्र अद्याप राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही ज्या कारखाना परिसरात राहतो, त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे तोडणी मजुरांचे म्हणणे आहे.