सांगली : दरवर्षी हजारो हेक्टरवर आडसाली ऊस लागवड करणाऱ्या शिराळा तालुक्यात उसाचे क्षेत्र सुमारे ५० ते ६० टक्क्यांनी घटले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने छोटी-मोठी धरणे, बंधारे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. ग्रामीण भागातील पाझर तलावात सध्या ६० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा आहे. तशातच जानेवारी महिन्यात पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी उपसा आठ दिवस बंद तर सात दिवस चालू केला आहे. पासण्याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भविष्यात ऊस गाळपावर होणार परिणाम होणार आहे.
चालू गाळप हंगामात तरी थोड्याफार प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. पुढील वर्षी मात्र यापेक्षा बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षीची परिस्थिती पाहता पुढील वर्षी कारखाने सुरु होतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात उसाचे क्षेत्र वाढले. नवनवीन तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, सेंद्रिय व रासायनिक ऊस शेती, योग्य बियाणे यामुळे शेतीचे अर्थकारण बदललेले दिसत होते. मात्र, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र पन्नास ते साठ टक्क्यांनी घटले आहे.