शिंदे कारखान्यांकडून ११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप : संस्थापक-अध्यक्ष, आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब या दोन्ही कारखान्यांचे आजपर्यंत ११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. ३१ डिसेंबरअखेर ऊस बिल व १५ डिसेंबरअखेर तोडणी वाहतूक बिल शेतकऱ्यांच्या व वाहन मालकांच्या खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष, आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

आ. शिंदे म्हणाले की, १६ ते ३१ जानेवारी, २०२४ मध्ये गाळपास आलेल्या उसासाठी अंतिम ऊस दरापेक्षा प्रती टन ५० रु. १ ते २८ फेब्रुवारीपर्यंतच्या उसाला प्रती टन १०० रुपये, तर १ मार्चपासून पुढे गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रती टन १५० रु. प्रमाणे वाढीव ऊस दर देण्यात येईल. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब येथील सन २०२३-२४ चा गाळप हंगाम जोमाने सुरू असून युनिट नं.१ येथे आजअखेर आठ लाख २२ हजार ९४८ मे.टन ऊस गाळप झाले आहे.

या हंगामामध्ये युनिट नं.१ कडे सहवीज प्रकल्पातून आजअखेर तीन कोटी ३० लाख ६५ हजार युनिट वीज निर्यात करण्यात आली असून डिस्टिलरी प्रकल्पातून एक कोटी ७० लाख ५७ हजार २८७ लि. अल्कोहोल व एक कोटी १५ लाख १० हजार ५८९ लि. इथेनॉल उत्पादन झाले आहे. युनिट नं.२२ येथे आजअखेर दोन लाख ८० हजार ७८४ मे.टन उसाचे गाळप होऊन सहवीज प्रकल्पातून आजअखेर एक कोटी एक लाख १३ हजार युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे.

दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर ११ लाख तीन हजार ७३२ मे.टन उसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामामध्ये युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंबकडे २१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या सहाव्या १० दिवसांचा उसास प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. कारखान्याने ४७ कोटी २० लाख बँकेत जमा केले आहेत. तोडणी वाहतूक बिलापोटी १७ कोटी ५६ लाख जमा केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here