पुणे : राज्यात आतापर्यंत 463 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर 41.86 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागच्या दोन महिन्यात राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त उसाचे गाळप पूर्ण केले. गाळपात पुणे विभागाने बाजी मारली असून, साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग अव्वल ठरला आहे. हंगामाचा सरासरी साखर नऊ टक्क्यांवर आहे. हंगामात राज्यातील 97 सहकारी साखर कारखान्यांचा साखर उतारा 9.53 टक्के तर 100 खासगी कारखान्यांचा उतारा 8.52 टक्के आहे.
राज्यात एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले. यंदा 97 सहकारी तर 100 खासगी कारखाने गाळप करत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला 75 ते 80 लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल अशी शक्यता होती. मात्र, उसाच्या एकरी उत्पादनात वाढ दिसून आल्याने 90 लाख टनापर्यंत साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज आहे. चांगला साखर उतारा मिळाल्याने कोल्हापूर विभागाने 98 लाख टन उसाचे गाळप करून दहा लाख टन साखरेचे उत्पादन केले. पुणे विभागाने 9.28 टक्के साखर उतारा मिळवत 104 लाख टन उसाचे गाळप करून साडेनऊ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. सोलापूर विभागातही साखर उत्पादन 8.3 लाख टनांपर्यंत पोहचले आहे.