सांगली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांपेक्षा कर्नाटक राज्यात उसाची पहिली उचल प्रती टन १०० ते १५० रुपये कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस घालावा. कर्नाटकात ऊस पाठवून आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाने केले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी ठराविक भागातच त्यांची तोडणी वाहतूक यंत्रणा राबवण्याऐवजी सर्वच भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास यावा, यासाठी पुरेशी यंत्रणा राबवावी असे आवाहन पक्षातर्फे सुनील फराटे यांनी केले आहे.
फराटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अनेक शेतकऱ्यांना ऊस घालविण्याची घाई झाली आहे. कमी दराने ऊस देऊन गहू, हरभरा करण्याची मानसिकता आहे. मात्र हे नुकसानकारक आहे. घाईगडबडीत आर्थिक नुकसान करणारा निर्णय शेतकऱ्यांनी घेऊ नये. कर्नाटकातील काही कारखान्यांत दीड ते दोन टनाची तफावत असते. उसाच्या उताऱ्यामध्येही १ ते २ पाईंटचा फरक पडतो. परिणामी उत्पादकांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्याचे आणि कारखान्यांनी तोडणी यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. निवेदनावर रामभाऊ कणसे, कुमार पाटील, विजय शिंदे, अजित लांडे, प्रकाश साळुंखे, रणजित पाटील, शंकर कापसे, एकनाथ कापसे आदींच्या सह्या आहेत.