इथेनॉल, बारदान धोरणाचा सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना कोट्यवधीचा फटका

सातारा : बारदान (ज्यूट) उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेसाठी २० टक्के ज्यूटपासून उत्पादित पोती वापरण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र बारदान पोत्यांच्या सक्तीचा भुर्दंड साखर कारखानदारांना सोसावा लागणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. या निर्णयाने एफआरपीवरही परिणाम होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील कारखानदारांना सुमारे १३ कोटींचा फटका बसणार आहे. सध्या सर्व साखर कारखाने हे पॉलिथीन पोत्यामध्ये साखरेचे पॅकिंग करतात. एकदा पॅकिंग झाल्यानंतर त्यातील उत्पादित साखरेचे कोणतेच नुकसान होत नाही. हे पोते साखर कारखान्यांना साधारणतः २० रूपयांचा पडते. तर दुसरीकडे बारदान ताग, बांबूपासून बनवले जात असल्याने पॉलिथिन पोत्यापेक्षा याचा दर तिप्पट आहे. हे पोते ६० रुपयांना मिळते.

जिल्ह्यात सध्याच्या घडीला १६ साखर कारखाने कार्यरत असून साताऱ्यासह खंडाळा आणि कराड तालुक्यातील एमआयडीसींमध्ये साखरेसाठी लागणाऱ्या पोत्यांची निर्मिती केली जाते. बहुतांश कारखाने स्थानिक उद्योजकांकडून ही पोती खरेदी करतात. त्यामुळे ही उलाढाल जिल्ह्यात होते. मात्र, बारदानची सक्ती केल्यानंतर कारखानदारांना बंगालमधून या पोत्यांची खरेदी करावी लागणार आहे. याचा परिणाम स्थानिकांवर होणार आहे.

जिल्ह्यात या हंगामात सुमारे ८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामध्ये केंद्राच्या निर्णयाप्रमाणे २० टक्के म्हणजेच १६ लाख क्विंटल साखर बारदानमध्ये पॅकिंग करावी लागणार आहे. इतकी साखर पॉलिथिनमध्ये पॅकिंग करण्यास ६ कोटी ४० लाख रुपये खर्च येतो. मात्र, बारदानमध्ये याचे पॅकिंग करायचे म्हटल्यास तब्बल १९ कोटी २० लाख रुपये कारखान्यांना मोजावे लागणार आहेत.

पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅकिंग केल्यानंतर पोते फाटणे, साखर खराब होण्याचा धोका नसतो. मात्र, बारदानमध्ये पोते फाटणे व साखर वाया जाण्याचा धोका असतो. तसेच त्याला मुंग्या व उंदीर लागून हे नुकसान अधिक होण्याचा धोका आहे. तसेच या पोत्यांना पाणी लागल्यास साखरेचा गठ्ठा होण्याचीही भीती आहे. बारदान पोते जाग्यावर ६० रुपयांना पडत असले तरी बंगालमधून त्याची वाहतूक कारखानदारांना करावी लागणार आहे. लाखो पोती आणावयाची झाल्याने त्याचा वाहतूक खर्चही वाढणार आहे. त्यामुळे जाग्यावर ६० रुपयांना मिळणारे पोते कारखान्यात येईपर्यंत ७० रुपयांपर्यंत पोहचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here