सोलापूर : माळशिरस तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला असताना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून बँक, सोसायटीच्या कर्जाची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माळशिरस तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्याची बँक, सोसायटीमधून होणारी कपात थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी दिला आहे.
बोरकर म्हणाले कि, शासनाने ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे, त्या तालुक्यातील कर्जासह इतर वसुली ८८ थांबविली आहे, तसे आदेशही काढले आहेत. असे असताना देखील माळशिरस तालुक्यात शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून सर्रास कर्जाची वसुली केली जात आहे. ही वसुली तत्काळ थांबवावी अन्यथा ‘स्वाभिमानी’च्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. सचिन शेंडगे, दादा काळे, राजेश खरात, सचिन बोरकर, विलास काळे, सोमेश्वर राजगे, तायापा शिंदे, बाळु वाघमोडे, मुसा शिंदे, संदीप कपने, सुभाष माने, आप्पा शिंदे, देविदास सकट, मोहसीन शेख, विनोद कांबळे, किशोर गोरवे, प्रदीप पाटील, अक्षय पाटील, विजय वाघबरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.