नाशिक : जिल्ह्यात ४ जानेवारीअखेर ५ लाख १२ हजार ८५० मे. टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण ४ लाख ४५ हजार ५५६ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. तर साखर उतारा ८.६९ टक्के आहे. सद्यस्थितीत साखर उताऱ्यात कादवा कारखान्याने आघाडी घेतली आहे. कादवा कारखान्याचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून गेल्या दोन महिन्यांत कारखान्याने १ लाख ४१ हजार ८३८ मे.टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत १ लाख ५५ हजार ६७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक ११ टक्के आहे.
सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश हा खासगी कारखान्याने आतापर्यंत २ लाख ३० हजार ४७५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने सर्वाधिक १ लाख ७३ हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून कारखान्याचा साखर उतारा १० टक्के आहे. जिल्ह्यात या हंगामात रानवड, कादवा, नासाका हे तीन सहकारी तर रावळगाव आणि द्वारकाधीश या दोन खासगी कारखान्यांची चाके सुरू राहिली. त्यात कादवा आणि द्वारकाधीशच हे दोन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. अपुऱ्या ऊस पुरवठ्यामुळे रावळगाव, रानवड, नाशिक हे कारखाने कसेबसे चालविले जात आहेत.