धाराशिव : कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर साखर कारखान्याचा २२ व्या गळीत हंगामात दररोज सरासरी ६ हजार ५०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप होत आहे. रविवारी (दि.७) गाळपाच्या ६८ व्या दिवसापर्यंत ४,१६,८६० मेट्रिक टन उसाचे मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. दैनंदीन साखर उतारा ११.३० असून २ लक्ष ७१ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. ५२ लाख ६७ हजार ५०० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात करण्यात आली आहे. ऊस उत्पादकांना १५ दिवसाच्या आत ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन २,७०० रुपयेनुसार देण्यात येत असल्याची माहिती नॅचरल शुगर प्रशासनाने दिली आहे.
धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगरने १२ लक्ष मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामात लागवड केलेल्या सभासद व बिगर सभासद यांची १५ हजार हेक्टर क्षेत्राची ऊस नोंद कारखान्याकडे झाली आहे. १२ ते १३ लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदीन ७५०० मे. टन गाळप करण्यात आली आहे. अत्याधुनिक मशीनरीची उभारणी केली असल्याने बिगर सभासदांनाही न्याय मिळणार आहे. नॅचरल शुगरने ऊस गाळप क्षमता वाढविल्यामुळे व तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादकांचा नॅचरल शुगरलाच ऊस गाळपासाठी देण्याचा कल असल्यामुळे चालू गळीत हंगामात १२ लक्ष मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.