बीड : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. आता साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी गाळपासाठी ऊस कमी पडत आहे. त्यामुळे बहुतांश कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. कारखान्यांचे कर्मचारी नातेवाईकांकडेही उसाचा शोध घेत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांनी मात्र, जो कारखाना जास्त दर देईल, त्यालाच ऊस देण्याची भूमिका घेतली आहे.
यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. परिणामी उसाला पाणी कमी पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली. वाढ खुंटलेल्या उसाचा शेतकऱ्यांनी ओला चारा म्हणून वापर केला. यंदा पाण्याअभावी उसाचे उत्पादन घटले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पुढील वर्षीं लागवड कमी होईल. शेतकरी मागील वर्षीचा खोडवा ठेवणार नाही. त्यामुळे पुढील वर्षीही उसाची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे उसाला परिपक्वता येण्याआधीच तोडणी सुरू आहे. बहुतांश कारखाने ऊस परिपक्च होण्याआधीच ऊस तोडून नेत आहेत. याचा साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत आहे. जास्तीत जास्त गाळप व्हावे, यासाठी अपरिपक्व ऊसही तोडला जात आहे. सद्यस्थितीत गेवराई तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रती टन २७०० रुपयांपर्यंत दर जाहीर केलेला आहे. तीन खासगी कारखान्यांनी जवळपास 2700 रुपये दर जाहीर केलेला आहे.