कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र – कर्नाटक भागातील काही साखर कारखान्यांनी नजीकच्या राज्यातील गेटकेन उसाची भरमसाट आवक सुरू ठेवली आहे. परिणामी संबंधित कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गळीत लांबणीवर पडून त्यांचे नुकसान होत आहे. शासनाने परराज्यातून आवक होणाऱ्या गेट केन उसावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. आधीच ऊस दर प्रश्नामुळे यंदाचा गळीत हंगाम सुमारे तीन आठवडे लांबणीवर पडला. त्यामुळे तोडणी यंत्रणेचाही मुद्दा कारखान्यांना भेडसावत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी प्रतिटन ३१०० ते ३२०० रुपये जाहीर केलेली आहे; नजीकच्या राज्यात मात्र तीन हजाराच्या आसपासच दर आहे. त्यामुळे तेथील ऊस उत्पादक कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठविण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी स्थानिक ऊस तोडणी मजूर टोळ्या गठित करून वाहनांचीही व्यवस्था केली आहे. परराज्यातील गेटकेन उसासाठी कोणतीही तोडणी क्रमपाळी लागू त्वरित गाळप केला जात आहे. यात जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ऊस उत्पादनातील घटीबरोबरच गाळपातील दिरंगाईमुळे होणाऱ्या वजन घटीमुळे शेतकऱ्यांना लक्षणीय तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अस्वस्थ झाला आहे.