सोलापूर : साखर उद्योगातील आघाडीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म ‘चिनीमंडी’द्वारे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरुप देशमुख यांना उत्कृष्ट व्यवस्थापनाचा कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवॉर्डस् २०२४ चा एक भाग आहे. या पुरस्काराचे वितरण एक फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे ‘शाश्वतता जागतिक साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी’ या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनात होणार आहे. साखर उद्योगातील नावीन्य, सातत्य आणि तंत्रज्ञान स्वीकृतीसाठी हा पुरस्कार दिला गेला आहे.
कार्यकारी संचालक स्वरुप देशमुख यांचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री, विजयसिंह मोहिते – पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.