सोलापूर : केंद्र सरकारने सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याने साखर कारखान्याचे सुमारे १२०० ते १५०० मे. टन ऊस गाळप कमी होत आहे. या हंगामात कारखान्याचे १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. परंतु उद्दिष्टापेक्षाही जास्तीचे गाळप कारखाना करणार आहे, अशी माहिती श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यात उत्पादित झालेल्या ५ लाख ५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन परिचारक यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
परिचारक म्हणाले की, सभासदांचे नुकसान होवू नये, म्हणून इतर कारखान्यांना ऊस देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे वेळेवर ऊस गाळप होईल. व्यवस्थापनाने विस्तारीकरण केल्यामुळे प्रतीदिन ८ हजार मे. टनापर्यंत ऊस गाळप करीत असल्याचेही परिचारक यांनी सांगितले. हंगामात कारखान्याने ६९ दिवसांत ५ लाख ३३५ मे. टन ऊसाचे गाळप करुन सरासरी १०.९४ टक्के साखर उतारा मिळवला आहे. अद्याप सुमारे ७.५० लाख मे. टन ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. को-जनरेशन मधून २.८४ कोटी युनिट विज निर्मीती केली असून आसवनी प्रकल्पामधून ४० लाख बल्क लि. उत्पादन घेतले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.