माळेगाव साखर कारखान्याची सहकारातून समृद्धीकडे कौतुकास्पद वाटचाल : खासदार कविता पाटीदार

पुणे : सहकाराच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या मुलांना सहकारातून दर्जेदार शिक्षणासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची उभारणी केल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची संधी मिळाली. हे सहकारातून समृद्धीकडे जाण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन इंदूरच्या (मध्य प्रदेश) राज्यसभा खासदार कविता पाटीदार यांनी केले.

बारामती तालुक्यातील सांगवी येथील माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालकसहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या निवासस्थानी खा. कविता पाटीदार या भाजपाच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या पार्श्वभूमीवर देशातील सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी देशातील तज्ञांची मते जाणून घेण्यासाठी आल्या होत्या.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या मुलांना कमी खर्चात व सवलतीत दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करून शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची संपूर्ण माहिती चंद्रराव तावरे यांनी खा. पाटीदार यांना दिली. या माहितीची दखल घेऊन हाच पॅटर्न इंदूर भागासह देशभरात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. पाटीदार यांनी सांगितले.

यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी संचालक रंजनकुमार तावरे, भाजपचे लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, पंचायतराज सदस्य बापुराव कणसे, अॅड. शाम कोकरे, पोपट तावरे, दादा पाटील, प्रशांत तावरे, बाळासाहेब घाडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here