व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 चा एक भाग म्हणून भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील(UAE) द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी भारत-यूएई यांच्यात उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
संयुक्त अरब अमिरातीचे महामहीम राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 चे प्रमुख पाहुणे असून,त्यांनी या परिषदेत दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्य वाढविण्यावर आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे हार्दिक स्वागत केले आणि भारत-यूएई संबंधांना गती देण्याचा विचार आणि प्रयत्न याची आकांक्षा भारत जोपासत आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
भारत-यूएई उद्योग परिषदेच्या उदघाटन सत्रात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री (भारत)श्री पीयूष गोयल,आणि परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री, अर्थ मंत्रालय (UAE) महामहिम (H.E.) डॉ.थानी बिन अहमद अल झेउदी, यांच्या विशेष बीजभाषणांसह गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल यांच्या भाषणाचा समावेश होता.
श्री पीयूष गोयल, महामहीम डॉ.थानी बिन अहमद अल झेयुदी आणि श्री भूपेंद्र पटेल यांनी उदघाटन सत्राचा एक भाग म्हणून UAE – India CEPA परिषदेच्या (UICC) संकेतस्थळाचे औपचारिक प्रकाशन केले. या सत्रात भारतात भरभराटीस आलेल्या स्टार्टअपच्या व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यावर भारतीय उद्योग समूहाचे अध्यक्ष कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) नॅशनल स्टार्टअप कौन्सिल आणि स्नॅपडील आणि टायटन कॅपिटलचे सह-संस्थापक -श्री कुणाल बहल,यांनी नोंद केलेल्या अभिप्रायाचा समावेश आहे.
भारतीय उद्योग समूह आणि यूएई- स्टार्ट-अप यांच्या समन्वयाने सुरू केलेल्या “अनलॉकिंग ऑपॉर्च्युनिटीज: इंडिया- UAE स्टार्ट-अप इकोसिस्टम कन्व्हर्जन्स” या शीर्षकाअंतर्गत एक अहवालही या शिखर परिषदेत प्रकाशित करण्यात आला.
भारत-यूएई उद्योग परिषदेत व्यापार वित्त, गुंतवणूक सुलभता आणि क्षेत्रीय सहयोग यासारख्या क्षेत्रात पुढील सहकार्यासाठी एका लक्ष्यवेधी चर्चासत्रांचे आयोजन केले होते. भारतीय आणि यूएई शिष्टमंडळात सरकार आणि उद्योग क्षेत्रातील उभय प्रतिनिधींचा समावेश होता. या सत्रात भारतीय निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी यूएईमध्ये भारताची प्रस्तावित असलेल्या गोदाम सुविधेच्या भारत मार्टवरील सादरीकरणाचा समावेश होता.
भारत-यूएई यांच्यातील व्यापार 2022 मध्ये 85 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढला, ज्यामुळे यूएई 2022-23 या वर्षासाठी भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनला आणि यूएई हे भारताचे दुसरे-सर्वात मोठे निर्यात स्थान बनले. फेब्रुवारी 2022 मध्ये,ज्या देशासोबत यूएईने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारीचे करार (CEPA) केले आहेत असा भारत हा पहिला देश बनला.1 मे 2022 रोजी सेपा ( CEPA) लागू झाल्यापासून द्विपक्षीय व्यापारात अंदाजे 15% वाढ झाली आहे.
यूएई-इंडिया उद्योग परिषद हे भारत-यूएई द्विपक्षीय आर्थिक संबंधांचा परस्पर विकास आणि समृद्धीला गती देण्याच्या उद्देशाने पुढे टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
(Source: PIB)