कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष, खा. शरद पवार, उपाध्यक्ष व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कारखान्याच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील, संचालक सचिन मगदूम, सुनील मगदूम, शिवाजीराव पाटील, संजय नरके, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्यावतीने सात कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांसमवेत हा पुरस्कार स्वीकारण्याचा मान मिळाला. यामध्ये रघुनाथ निकम, कृष्णा पाटील, दिनकर निकम, श्रीकांत गवळी, मारुती यादव, बाळू कांबळे, शहाजी पाटील यांचा समावेश होता.
प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळाला : समरजितसिंहराजे घाटगे
‘चीनीमंडी’शी बोलताना ‘शाहू ग्रुप’चे प्रमुख आणि भाजपचे नेते समरजितसिंहराजे घाटगे म्हणाले कि,सध्या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा श्रीमती सुहासिनी घाटगे सांभाळत आहेत. शाहू कारखान्याने पारितोषिकाची परंपरा अखंडित ठेवली आहे असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, अयोध्येत श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त कागलमधील विविध धार्मिक कार्यक्रमांचे नागरिकांना निमंत्रण देत असताना कारखान्याला पुरस्कार जाहीर झाल्याचे समजले होते. त्याचे वितरणही समारंभपूर्वक झाले. यावरून आम्हाला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळाला, असेच आम्ही मानतो.