‘पांडुरंग’ची यंदा १० लाख मे. टन ऊस गाळप उद्दिष्टपूर्तीसाठी तयारी : चेअरमन प्रशांत परिचारक

श्रीपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यंदा, हंगाम २०२३-२४ मध्ये १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु कारखाना उद्दिष्टापेक्षाही जास्तीचे गाळप करणार आहे, अशी माहिती यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. कारखान्यात उत्पादित झालेल्या साखर पोत्यांचे पूजन चेअरमन परिचारक यांचे हस्ते झाले. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे आणि संचालक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.

चेअरमन परिचारक म्हणाले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. कारखाना विस्तारीकरणामुळे प्रती दिन ८,००० मे. टनापर्यंत ऊस गाळप केला जात आहे. केंद्र सरकारने सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्यामुळे कारखान्याचे सुमारे १,२०० ते १,५०० मे.टन ऊस गाळप कमी होत आहे. त्यामुळे सभासदांचे नुकसान होऊ नये म्हणून इतर कारखान्यांना ऊस देण्याचे धोरण निश्चित केले आहे. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे उसाच्या उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे टनेजमध्ये वाढ झाली आहे. दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण, कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here