कोल्हापूर : यंदा कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत २ लाख ३७ हजार २५० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यापासून २ लाख ८० हजार २६० क्विंटल साखर उत्पादन झाले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.९६ टक्के आहे. ७ लाख मेट्रिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी दिली. कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या पहिल्या ११ साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन विश्वास पाटील होते.
चेअरमन नरके म्हणाले की, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे. कारखान्याने हंगाम सुरू झाल्यापासून प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे १५ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा केली आहेत. यावेळी अॅड. बाजीराव शेलार, संजय पाटील, विलास पाटील, अनिल पाटील, सरदार पाटील आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी स्वागत केले..