पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदा बंद राहिला, परंतु पुढील वर्षी कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत, असे प्रतिपदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवडीबद्दल काळे यांचा आणि स्वप्निल ढमढेरे यांची क्रीडा सेल जिल्हाध्यक्षपदी निवडीबद्दल शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी काळे बोलत होते. या कारखान्याचा यशवंत साखर कारखाना होऊ देऊ नका, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले.
घोडगंगाच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे हाल होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, चालू वर्षी कारखाना बंद असल्यामुळे कार्यक्षेत्रातील अनेक ऊस उत्पादक अडचणीत आले. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे, सरपंच मनीषा जाधव, शीतल चव्हाण, सागर गराडे, संतोष फराटे, सतीश नागवडे, भाऊसाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
‘घोडगंगा’च्या चौकशीच्या आश्वासनानंतर पाचंगे यांचे उपोषण मागे…
भाजप उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या मागणीसाठी २७ डिसेंबर २०२३ पासून धरणे आंदोलन व २ जानेवारीपासून कारखान्याचे समोर उपोषण सुरू केले होते. याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांनी कागदपत्रे दिल्यानंतर चौकशी व कार्यवाहीचे लेखी आश्वासनाचे पत्र ई-मेलवरून पाठवले. त्यानंतर आंदोलनाला बसलेल्या पाचंगे यांनी पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडले.