बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने गाळप केले आहे. कारखान्याने गेल्या ६७ दिवसांमध्ये, ११ डिसेंबरअखेर ३,४०,२०० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ९१ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.७२ टक्के असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके यांनी दिली.
चेअरमन सोळंके यांनी सांगितले की, कारखान्याने ११ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळपास आलेल्या ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रती टन २७०० रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. कारखान्याने आजअखेर ६६ लाख ४७ हजार ५७६ लिटर सिरप इथेनॉल आणि १२ लाख ४२ हजार ५७४ लिटर बी. हेवी इथेनॉलचे उत्पादन केले आहे. तर महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीस १ कोटी ५३ लाख २१ हजार ६०० युनीट विज वितरण केले आहे. एकुण १०.१८ कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आल्याचे चेअरमन विरेंद्र सोळंके सांगितले.