पुणे : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अंकुशनगर युनिटला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून हंगाम २०२२-२३ करीता ‘उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार’ मिळाला. कारखान्याला पाचव्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. उत्तर पूर्व विभागातून कर्मयोगी कारखान्याने हंगाम व जातनिहाय लागण योजनेची केलेली प्रभावी अंमलबजावणी, ठिबक सिंचन, राबविलेल्या कल्याणकारी योजना यामुळेच कारखान्यास हे पारितोषिक मिळाले आहे.
पुणे येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खा. शरदराव पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. याबाबत आमदार राजेश टोपे म्हणाले की, कारखान्याच्या उल्लेखनीय कामगिरीची यानिमित्ताने दखल घेतली गेली. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, खोडवा पीक उत्पादन वाढीसाठी कारखान्याने सातत्याने केलेले प्रयत्न, ऊस विकास योजना राबविण्यासाठी निधीची तरतूद यातून या पुरस्कारासाठी कारखान्याची निवड करण्यात आली आहे.