कोल्हापूर : महाराष्ट्रात देशात सर्वाधिक म्हणजे 210 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. प्रत्येक साखर कारखान्याला गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालावा, यासाठी राज्यात साखर कारखाने उभारण्यासाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट घालण्यात आली आहे. मात्र, साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची आग्रही मागणी मंगळवारी (16 जानेवारी 2024 ) पुन्हा एकदा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. 25 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याबाबत विद्यमान साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात टोकाची मतभिन्नता असल्याने याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामात एकूण 197 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये 97 सहकारी आणि 100 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात 202 साखर कारखाने सुरू होते.
हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखानदारांची मक्तेदारी:शेतकरी नेत्यांचा दावा
मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात कारखान्यांवर हवाई अंतराची कोणतीही अट नको आहे. सर्वच कारखान्यांनी आपल्या गाळप क्षमता आणि सिंचन व्यवस्थेत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना उसाच्या उपलब्धतेचा प्रश्न येत नाही. 25 किलोमीटरच्या हवाई अंतराच्या नियमामुळे काही राजकीय नेत्यांची साखर उद्योगात मक्तेदारी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी साखर उद्योगात खुली स्पर्धा निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे हवाई अंतराची अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी शेतकरी नेत्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी, रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील आदी सर्व नेत्यांनी 25 किलोमीटरच्या हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे.
उसासाठी स्पर्धा निर्माण झाली तरच शेतकऱ्यांना होईल फायदा !
हवाई अंतराची अट रद्द करून शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. खासगी उद्योजकांना कारखाना सुरू करण्याची परवानगी देऊ नका. पण, पाच ते सहा कुटुंबांच्या हातात गेलेला हा उद्योग सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणीही शेतकरी संघटनांनी केली आहे. साखर कारखानदारांभोवती सत्ता केंद्रित झाल्याची रास्त टीका सातत्याने शेतकरी संघटनांकडून होते. कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, हवाई अंतराची अट रद्द झाल्यास कारखानदारांमध्ये ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी भूमिका शेतकरी नेते मांडत आहेत.
उसाअभावी साखर कारखाने बंद पडण्याची शक्यता…
साखर कारखानदारांच्या मते हवाई अंतराची अट रद्द केल्यास कुठलाच कारखाना पूर्ण कार्यक्षमते चालू शकणार नाही. कारखाने तोट्यात जातील, अनेक कारखाने बंद पडतील. त्यातून पुन्हा कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. कारखानदारांच्या मते अगोदरच गाळप हंगाम 180 दिवसांवरून 100 ते 120 दिवसांवर येऊन ठेपला आहे. कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी अगोदरच उसाची पळवापळवी सुरु आहे. त्यात पुन्हा हवाई अंतराची अट रद्द करून नवीन कारखाने स्थापन झाल्यास कुठलाच कारखाना पूर्ण क्षमतेने चालू शकणार नाही. कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडू शकतात. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.
राज्य सरकार साखर कारखानदारांना दुखावणार का ?
राज्यात कुठल्याही पक्षाची सत्ता आली तर त्यामध्ये साखर कारखानदार मोठ्या संख्येने निवडून येत असल्याचे चित्र आहे.एव्हाना तुम्हाला आमदार किंवा खासदार व्हायचे असेल तर तुमच्याकडे एखादा तरी साखर कारखाना हवाच, असे चित्र राज्यातील सत्ताधारी गट आणि विरोधी गटाकडे बघितल्यावर पाहायला मिळते. सध्याच्या महायुतीच्या मंत्रिमंडळावर नजर टाकली तरी त्यात अनेक साखर कारखानदार कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर विराजमान असल्याचे पाहायला मिळते. महाविकास आघाडीतलेही अनके आमदार हे साखर कारखानदार आहेत. अशास्थितीत राज्य सरकार असो अथवा विरोधी पक्ष कोणीही स्वपक्षातील आमदार, खासदार यांना दुखावण्याची शक्यता अत्यंत दुर्मिळ वाटते.
देशाच्या यंदाच्या गाळप हंगामावर एक दृष्टीक्षेप…
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) च्या आकडेवारीनुसार, 15 जानेवारी 2024 पर्यंत देशातील 509 साखर कारखान्यांमध्ये 2023-24 चा गाळप हंगाम सुरू झाला असून 1563.00 लाख टन उसाचे गाळप झाले असून 148.70 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यावेळेपर्यंत 2022-23 च्या मागील हंगामात 519 साखर कारखान्यांनी 1681.49 लाख टन उसाचे गाळप करून 160.00 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.देशातील साखरेची सरासरी रिकव्हरी 9.51 टक्के आहे, तर गेल्या हंगामात 9.52 टक्के होती. साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 51 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर उत्तर प्रदेशात 46.10 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.