सातारा : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम गतीने सुरू आहे. कारखान्याने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या उसाला ३००० रुपये प्रती टन यानुसार ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपयांची बिले दिली आहेत. सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती अजिंकतारा उद्योग समूहाचे मार्गदर्शक, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. चालू गळीत हंगामात एकूण १ लाख ७८ हजार ८२६.०४९ टन ऊस गाळप झाले आहे, असे ते म्हणाले.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, जावळी तालुक्यातील बंद प्रतापगड कारखाना समुहाने यंदापासून सुरू केले आहे. गळीत हंगाम गतीने सुरू आहे. १ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३७ हजार ७८७. ३४४ मे. टन गाळप झाले. या उसाची ११ कोटी ३३ लाख ६२ हजार ३२ रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहेत. यापूर्वी कारखान्याने नोव्हेंबर महिन्यात गाळप केलेल्या ५८ हजार ७३६.६६१ मे. टन उसापोटी १७ कोटी ६२ लाख ९ हजार ९८३ रुपयांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.