धाराशिव : सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्यावतीने पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे. कारखान्याच्यावतीने २० जानेवारी ते १५ मार्च यांदरम्यान गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन २,८०० रुपये दर दिला जाईल. तर १५ मार्चनंतर कारखाना बंद होईपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन २,९२५ रुपये दर दिला जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांनी दिली. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप होईपर्यंत कारखाना बंद केला जाणार नाही, असे ते म्हणाले.
कार्यकारी संचालक धनंजय सावंत म्हणाले की, भैरवनाथ शुगरने १७ नोव्हेंबरपासून गाळप सुरू केले आहे. ५६ दिवसांत २ लाख ८ हजार टन उसाचे गाळप करुन १ लाख ६४ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा सरासरी उतारा ९.५१ टक्के आहे. कारखान्याने आतापर्यंत २,७२५ रुपये पहिली उचल दिली आहे. परंडा तालुक्यातील सर्वाधिक १ लाख ७८ हजार ८८३ टन उसाचे गाळप केले आहे. त्यानंतर भूम, करमाळा, जामखेड तालुक्यातील ऊस कारखान्याकडे गाळपास आला आहे.