साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करण्याची शेतकरी नेत्यांची मागणी

पुणे : सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्याने परवाना देताना सरकारने दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरची हवाई अंतराची अट रद्द करावी अशी मागणी मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्तांकडे केली. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीची बैठक झाली.

यावेळी साखर संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे, यशवंत गिरी (अर्थ) व अन्य अधिकाऱ्यांसह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भानुदास शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावतीने अॅड योगेश पांडे, ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्यांमध्ये कैलास तांबे, दामोदर नवपुते आदी उपस्थित होते. दरम्यान, ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांमध्ये मतभेद दिसून आले.

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, सरकारच्या निर्देशानुसार, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीची बैठक झाली. त्यामध्ये प्रत्येक सदस्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. काही सदस्यांकडून दोन दिवसांत लेखी म्हणणे सादर होईल. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे पाठवू.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, केंद्राने नेमलेल्या सी. रंगराजन समितीच्या अहवालात दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढून टाकण्याची शिफारस केली आहे. मात्र, ही अट वगळता इतर शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत. यात खाजगी कारखानदार व भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. अंतराची अट रद्द करावी अशी आमची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here