सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याशी मोहिते-पाटील परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध असून हा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढला जाईल. हा कारखाना सहकारीच राहील. तेथील संचालक मंडळच हा कारखाना चालवतील, असे प्रतिपादन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले. करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील, जयवंतराव जगताप, सविताराजे भोसले, कन्हैयालाल देवी, विलास घुमरे आदी उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ वाढवण्यासाठी सहकार महर्षीनी व विजयदादांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करु. त्याचा राजकीयदृष्ट्या फायदा घेणार नाही. यावेळी विलास घुमरे यांनी बागल गटाच्यावतीने आमदार मोहिते पाटील यांचा निर्णय मान्य असेल असे सांगितले. जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील यांनीही मोहिते-पाटील जो निर्णय घेतील त्याला आम्ही सर्वजण सहमती देवू असे सांगितले.