लातूर : बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. अनेक आजी-माजी संचालकांना चेअरमन पदांचे डोहाळे लागले आहेत. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मातोळा सभेत बोलताना मारुती महाराज कारखाना निवडणुकीत काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल तर काही जणांचा खांदेपालट करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे चेअरमन व व्हाइस चेअरमनपदावरही कोणाची वर्णी लागणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
२००० साली स्थापन झालेल्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्व पक्षांतील काही प्रमुखांना सोबत घेऊन ८, ४, ४, आणि १ असा फॉर्म्युला निवडणुकीच्या सुरुवातीलाच ठरला होता. यातून १४ जागांचा प्रश्न सुटला. मात्र, दोन जागांसाठी चौघे इच्छुक असल्याने निवडणूक लागली. मात्र, निवडणुकीपूर्वीच दोघांनी माघार घेवून सर्व निवडणूक बिनविरोध केली. निवडून आलेल्यांमध्ये संतोष भोसले, सुभाष जाधव, विलास काळे, गणपती बाजुळगे, श्रीपतराव काकडे, शामराव साळुंके, शाम भोसले, सचिन पाटील, अनिल पाटील, बाबासाहेब गायकवाड, शुभांगी बिराजदार, निवेदिता पाटील, भरत माळी-फुलसुंदर, गोविंद सोनटक्के, रमाकांत वळके व अमित माने यांचा समावेश आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा कोणाला संधी देतात याची उत्सुकता आहे.