जालना : अंबड तालुक्यातील शहागड येथील कर्मयोगी अंकुशरा टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात युनिट १ व २ मिळून ६ लाख ६१ हजार ५४० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यातून ४ लाख ७६ हजार ४०५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा हा ७.५५ इतका आला आहे. समर्थ कारखाना हा साखर, बायप्रॉडक्ट व वीजनिर्मितीमध्येही परिपूर्ण झाला आहे. कारखान्याने आतापर्यंत दोन कोटी युनिट विज निर्माण केली आहे.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अंकुशनगर युनिट १ मध्ये ७० दिवसांत ४ लाख ३४ हजार १७० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यातून २ लाख ८५ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा ६.६९ आला आहे. सागर कारखान्याच्या तीर्थपुरी युनिटमधून ७२ दिवसांत २ लाख २७ हजार ३७० मेट्रिक टन गाळप झाले. यातून येथे १ लाख ९१ हजार २०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याने वीज निर्मितीमध्येदेखील विक्रम केला आहे. यंदाच्या हंगामात २ कोटी ४५ लाख ४ हजार युनिट वीज निर्मिती केली आहे. ९२ लाख ५६ हजार ९८६ युनिट वीज कारखान्याने वापरली असून तब्बल १ कोटी ५२ लाख ४७ हजार १४ युनिट वीज ही महावितरणला विक्री केली आहे. ऊस उत्पादनात घट यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादनात, सरासरी हेक्टरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
समर्थ व सागर कारखान्याच्या डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पातून १ कोटी ३४ लाख १ हजार ९१२ लिटर अल्कोहोलचे उत्पादन झाले. तर १ कोटी १८ लाख ३६ हजार ८८४ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. शेती विभागाने ऑनलाइन ऊस नोंदी कराव्यात व नियमाप्रमाणे कर्म पाळी व परिपक्वतेनुसार ऊस तोड करावी. शेतकऱ्यांकडून तक्रारी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे कारखाना व्यवस्थापनाने कळविले आहे.