पुणे : ऊसतोड मजूर व मुकादम यांच्याकडून फसवणूक झाली असल्यास वाहतूकदारांनी एकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये, असे आवाहन बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले. भोईटे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर, वाहतूकदार, कारखाना प्रतिनिधी यांच्यासोबत साधला. यावेळी फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी आपापल्या तक्रारी भोईटे यांच्यासमोर मांडल्या. वाहतूकदारांनी एकत्रित तक्रारी दाखल कराव्यात. पुरावे तपासून रीतसर गुन्हे दाखल करून फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांकडून समन्स पाठवू, असे भोईटे यांनी स्पष्ट केले.
भोईटे यांनी वाहतूकदारांशी चर्चा केली. जळगाव जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांशीही मोबाईलवरून संपर्क साधला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार पांडुरंग कान्हेरे उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचलाक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, प्रवीण कांबळे, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, सतीश काकडे, विधी सल्लागार अॅड. अभिजित जगताप, वाहतूक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यासाठी पोलिसांच्या पातळीवर विशेष समितीही स्थापन केली जाईल असे सांगण्यात आले.