पुणे : जिल्ह्यात यंदा २०२३-२४ मध्ये १४ कारखान्यांकडून आतापर्यंत ६४ लाख ७० हजार २०४ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर, ६१ लाख ७६ हजार ९१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. बारामती ॲग्रो या खासगी कारखान्याने ऊस गाळपात आपली आघाडी कायम ठेवली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर ९.५५ टक्के आहे. जिल्ह्यात चालू वर्षी सुमारे १ कोटी ५१ लाख टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे.
बारामती ॲग्रो कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता सर्वाधिक म्हणजे १८ हजार टन आहे. कारखान्याने सर्वाधिक ११ लाख ९६ हजार ३९० टन उसाचे गाळप करून सरासरी ८ टक्के उताऱ्यानुसार ९ लाख ९४ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ८० हजार १९ टन ऊस गाळप करून ११ टक्के उताऱ्यासह ७ लाख ६१ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ५७ हजार ५०० टन, भीमा शंकर सहकारी कारखान्याने ५ लाख ४२ हजार ६१० टन, दौंड शुगर कारखान्याने ५ लाख २३ हजार ६०० टन, विघ्नहर सहकारी कारखान्याने ४ लाख ४८ हजार ११० टन ऊस गाळप केले आहे.