प्राज उद्योग समूहाच्या मद्यार्कपासून हवाई इंधन बनवणाऱ्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे : पुण्याजवळील पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील प्राज उद्योग समूहाच्या संशोधन आणि विकास विभागात सुरू करण्यात आलेल्या मद्यार्कापासून हवाई इंधन बनवणाऱ्या पहिल्या पथदर्शी तंत्रज्ञान प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पातून शाश्वत जैविक हवाई इंधनाची (एसएएफ) निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमाला प्राजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासह इंडियन ऑईल आणि अन्य तेल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. ब्राझिलच्या आधी भारतात या जैविक हवाई इंधनाचा प्रकल्प उभा राहिल्याबद्दल पुरी यांनी यावेळी तंत्रज्ञांचे जाहीर अभिनंदन केले आणि हा प्रकल्प खऱ्या अर्थाने पथदर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

उद्घाटनानंतर पुरी यांनी अन्य अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पाची पाहणी केली आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल समाधान व्यक्त केले. मद्यार्कपासून बनवलेल्या हवाई इंधनाचा वापर करून गेल्या वर्षी पुणे ते दिल्ली हा विमान प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला होता. यावेळी पुरी म्हणाले की, जैविक हवाई इंधनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यासाठी आवश्यक तो कच्चा शेतमाल उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून, जैविक हवाई इंधनासाठी जगभरातील बहुतेक देशांची भारताकडून मोठी अपेक्षा असल्याचे दावोस इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक व्यापार परिषदेतही दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here