कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील काही भागात ऊस वाहतूक व तोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे ऊसतोडणी वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. जानेवारी संपत आला तरी उसाला टोळ्यांकडून हातही लागलेला नाही. अशातच अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटले असून, वजनात घट होऊ लागल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात टोळ्यांची संख्या कमी असल्याने उसाला तोड मिळाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिवारातच उभा आहे. अशातच आता उसाला तुरे फुटू लागले असून, कडक उन्हाचा मारा सुरू झाल्याने वजनात घट होत आहे. टोळ्या मिळत नसल्याने काही शेतकरी स्वतः तोडणी करून ऊस कारखान्यांकडे पाठवित आहेत.
कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या ऊसतोड टोळ्या आलेल्या नाहीत. स्थानिक टोळ्यांकडून ऊसतोड केली जात असली तरी त्यांचे प्रमाण नगण्य आहे. एरवी नोव्हेंबर-डिसेंबरअखेर रिकामी होणारी उसाची शिवारे तशीच दिसत आहेत. यावर्षी तुलनेत थंडीचे प्रमाण कमी असून, दिवसभर कडक उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. यामुळे उसाच्या वजनात घट होऊ लागली आहे. त्यामुळे कोणी टोळी देता का टोळी? अशी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.