लातूर : येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी शाम रवींद्र भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दि. २३ रोजी व्हॉईस चेअरमनपदी सचिन सुभाष पाटील यांची निवड झाली. दोन्ही पदांसाठी केवळ प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाले होते. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार चेअरमन पदासाठी शाम भोसले तर व्हॉईस चेअरमन पदासाठी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
कारखान्याच्या १६ पैकी १४ संचालकपदाची बिनविरोध निवड आधीच झाली होती. दोन जागांसाठी चार उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. दोन जागेवर निवडणूक झाल्यानंतर मंगळवारी पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सात वर्ष बंद असलेला मारुती महाराज कारखाना सुरू व्हावा, यासाठी शाम भोसले यांनी माजीमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मातोळा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. याठिकाणीच आ. अमित देशमुख यांनी हा कारखाना सुरू करण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला होता. तो आता पूर्ण झाला आहे.