अहमदनगर : सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यांकडून जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे. जवळा हे गाव सीना नदीच्या काठावर असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उसाचे उत्पन्न वाढविले आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट पेटवून देतात. मात्र, हे पाचट पेटवून न देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. याला शेतकरीदेखील प्रतिसाद देत आहेत. उसाचे पाचट न पेटवता त्याची मशीनद्वारे कुटी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मंडळ कृषी अधिकारी जनार्धन सरोदे, कृषी पर्यवेक्षक आर. के. शिंदे, कृषी सहायक सागर बोलभट हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तालुक्यात सरासरी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना बोलभट म्हणाले कि, आम्ही शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देत आहे. ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारे पाचट कुजवल्याने जमिनीचा पोत सुधारून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
मागीलवर्षी जवळा परिसरातील ५० एकर क्षेत्रावर पाचट कुजविण्यात आले आहे. त्यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊन उत्पन्न वाढले आहे. प्रोत्साहनपर पाचट कुटी यंत्रासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुदानदेखील देण्यात येत असल्याचे बोलभट यांनी सांगितले.
पाचट न जाळण्याचे फायदे काय ?
■ पाचट पेटवल्याचे अनेक तोटे आहेत. पाचट पेटवल्यामुळे वातावरणातील तापमान वाढते. जमिनीचे तापमान वाढल्यामुळे जिवाणू नष्ट होतात. याउलट पाचट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत.
■ पाचट ठेवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच जमिनीचा १ ते १.५ टन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्यामुळे जिवाणूंची संख्या वाढल्याने खोडवा उसाच्या उत्पादनात वाढ होते.
■ जमिनीत जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे भविष्यातः ज्या जमिनी नापीक होणार आहेत, तो धोका वाचतो. पाचट ठेवल्यामुळे रासायनिक खतांची उपलब्धता होते. नत्र, स्फुरद, सेंद्रिय कर्ब, पालाश यांचा मोबदला मिळतो. तसेच रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते.