सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘बेस्ट एम.डी. ‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था भारतीय शुगरतर्फे त्यांचा सन्मान होणार आहे. रोख ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १० फेब्रुवारीला कोल्हापूर येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. पुरस्काराने पांडुरंग कारखान्याच्या लौकिकात आणखी भर पडली आहे. कारखान्याला आतापर्यंत राज्य व देशपातळीवरील ५० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘बेस्ट एम.डी.’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक उमेश परिचारक, संचालक मंडळ व विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार युनियन व अधिकारी यांनी अभिनंदन केले. डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे आजपर्यंत कारखान्यास सतत ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. कारखाना प्रगतिपथावर नेत असताना नावीन्यपूर्ण योजनांचा अंगीकार, ऊस पीक मार्गदर्शन दिनदर्शिका, सुपंत साखर ब्रँड, सुपंत सोलर प्रोजेक्ट, सुपंत बायो फर्टिलायझर लॅब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, सहकार क्षेत्राला कारखान्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना त्यांनी राबवल्या आहेत.