सोलापूर : एका बाजूला तोडणीसाठी एकरी तीन ते चार हजार रुपये द्यायचे तर दुसऱ्या बाजूला कारखान्यांनी जळीत म्हणून ऊस दरात ५० रूपये कपात करायची, असा दुहेरी तोटा ऊस उत्पादकांना सहन करावा लागत आहे. पंढरपूर तालुक्यात यंदा कमी ऊस गाळपसाठी उपलब्ध असल्याने उसाची पळवापळवी सुरू आहे. त्यातच ऊस तोडणी यंत्रणा कमी आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस तोडणी कामगारांनी उसामध्ये पाचट जास्त आहे, तो पडला आहे, तण आहे अशी कारणे देत फड पेटवून देत ऊस गाळपास पाठवण्याचा सपाटा लावला आहे. ही लूट थांबविण्याची मागणी होत आहे.
अलीकडे फड पेटवून ऊस गाळपासाठी नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्याला वर्षभर जीवापाड जपलेला ऊस जाळीत म्हणून प्रतिटन ५० रूपये तोटा सहन करीत गाळपासाठी पाठवावा लागत आहे. याशिवाय, ऊस तोडणी कामगारांकडून एकराला तीन ते चार हजार रुपये तोडणीसाठी म्हणून ऊस मालकाकडून अतिरिक्त घेतले जात आहेत. शिवाय मटन, चिकन, गुटखा, मावा द्यावा लागत आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हरला दीडशे ते दोनशे रुपये एन्ट्री घेतली जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला शेतातील ऊस गाळपास पाठवण्यापर्यंत मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागत आहे. साखर कारखान्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत आहे.