सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील चार साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण ११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून १० लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गाळप हंगाम अजून सुरूच असून, १५ मार्चपर्यंत या चारही साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली असणार आहेत. बालाजीनगर येथील आवताडे शुगर, मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, लवंगीतील भैरवनाथ शुगर व कचरेवाडीतील युटोपियन शुगर या कारखान्यांचा यात समावेश आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तालुक्यात सर्वच साखर कारखान्यांचे गाळप कमी होताना दिसून येत आहे. मागील वर्षी मंगळवेढ्यातून सुमारे १७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यंदा १५ ते १६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. याला दुष्काळी परिस्थिती कारणीभूत आहे. गाळपात आमदार समाधान आवताडे यांचा आवताडे शुगर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा युटोपियन शुगर, शिवानंद पाटील अध्यक्ष असलेला व तालुक्यातील एकमेव सहकारी असलेला श्री संत दामाजी शुगर तर सावंत बंधूंचा भैरवनाथ शुगर असा क्रमांक लागतो. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगितले की, चालू वर्षी उसाचा उतारा कमी आहे. चालू वर्षी चार लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. पुढील वर्षी गाळप हंगाम अडचणीचा ठरणार आहे.