कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील स्वीकृत संचालकांच्या दोन जागांसाठी चौघे इच्छूक आहेत. त्यामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्यायला लागू नये यासाठी निवडणूक होऊन सव्वा वर्ष उलटले; तरी स्वीकृत संचालकांची निवड झालेली नाही. नेते मंडळींकडूनच संचालक निवडीचा विषय प्रलंबित असल्याचे समजते. नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. सद्यस्थितीत डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे.
स्वीकृत संचालकपदासाठी दीपक जाधव, जयश्री सचिन पाटील आणि किरण पाटील हे तिघे इच्छूक आहेत. याशिवाय, राहुल शिरकोळे हेही इच्छुक आहेत. गेल्या वेळी कारखान्यात विरोधात लढलेल्या शहापूरकर, चव्हाण यांना सोबत घेतल्याने मुश्रीफ यांना नव्या आघाडी रचनेत काही विद्यमानांनाही बाजूला ठेवावे लागले आहे. आता विद्यमान संचालक मंडळात शहापूरकर – मुश्रीफ समर्थकांत टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्वीकृत संचालक निवडीबद्दल साशंकता आहे.