कोल्हापूर : खोची परिसरात कार्यरत यांत्रिक ऊस तोडणीमुळे उसाची शिवारे मोकळी होऊ लागली आहेत. तोडणी मशीनच्या मदतीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ऊस दर आंदोलनामुळे तोडणी हंगाम तीन आठवडे पुढे गेला. या दिवसात ऊस तोडणी टोळ्या शेजारच्या राज्यात गेल्याचा आरोप सर्वच कारखान्यांनी केला. त्यामुळे तोडणी हंगामात अडथळे आले. त्यामुळे लावण ऊस क्षेत्र रिकामे होण्यास शेतकऱ्यांना डिसेंबर अखेर, तर काही ठिकाणी जानेवारीअखेर वाट पाहावी लागली.
ऊस तोडणी उशीरा झाल्यामुळे रब्बी हंगामात पीक उत्पादन होणार नाही. गहू, हरभऱ्याचे क्षेत्र कमी झालेले दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पुन्हा ऊस लावण करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. यांदरम्यान, खोची परिसरात चार ऊसतोडणी यंत्रे कार्यरत आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणात दररोज गाळपास पाठवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.