इथेनॉल उत्पादनासाठी जादा साखर वापराची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा

नवी दिल्ली : साखर उत्पादन यंदा अपेक्षेइतके घटणार नाही, असा दावा साखर उद्योगाने केल्यानंतरही केंद्र सरकार इथेनॉल निर्मिती वाढवण्यासाठी साखर वळविण्यास आणखी परवानगी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसते. सध्या या हंगामातील १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी आहे. जोपर्यंत केंद्राची पुरेशा साखर उत्पादनाबाबत खात्री होत नाही तोपर्यंत वाढीव परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

साखरेचे बाजारातील दर मोठ्या प्रमाणात वाढतील व त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसेल या हेतूने केंद्राने ऑगस्टपासून साखर उद्योगाकडे करडी नजर केली. येत्या एक, दोन महिन्यांमध्ये निवडणुकांचा कालावधी असल्याने केंद्र शासन खुल्या बाजारात साखरेचे दर वाढविण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी देणे अशक्य असल्याचे अन्न सार्वजनिक पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. साखरेच्या विक्री कोट्यावर निर्बंध आणून त्यावर सातत्याने नजर ठेवली. मागणीपेक्षा काहीशी जादा साखर उपलब्ध करण्याकडे केंद्राचा कल राहिला. यामुळे साखरेचे दर हवे तितके वाढले नाहीत. सरकारने जर अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळविण्यास परवानगी दिल्यास नुकसानीच्या छायेत असलेल्या प्रकल्पांना दिलासा मिळेल, असे साखर कारखानदारांच्या संघटनांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here