पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उसाचे फड पेटवून तोडण्याचा सपाटा ऊस तोड कामगारांकडून सुरू आहे. त्यामुळे ऊस गाळपाला गेल्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक होत आहे. यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. सद्यःस्थितीत विहिरींमध्येही पाणी नसल्याने ऊस अडचणीत सापडला आहे. हा ऊस लवकर गाळपासाठी जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ते धडपड करीत आहेत. शेतकऱ्यांना शेतातच ऊस जाळून बाहेर काढावा लागत आहे.
वाल्हे, मांडकी, जेऊर, पिसुर्टी, हरणी या पट्ट्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. आता उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कालावधी होऊन गेलेला उभा ऊस शेताबाहेर काढायचा तरी कसा? म्हणून शेतकरी थेट तोडणी कामगारांसमोर फड पेटवून देऊ लागले आहेत. आधीच उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आले आहेत. ऊस तोडणी कामगारांना व वाहनचालकालादेखील जादा पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतांमध्ये साप, विंचू, खेकडे असल्याने कामगारांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणूनदेखील उसाचे उभे फड पेटवून देण्यात येत आहेत, असे ऊस तोडणी मुकादमांनी सांगितले.