अहमदनगर : हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (युनिट नंबर चार) या साखर कारखान्याचे दहा लाखाव्या साखरपोत्याचे पूजन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ओंकार साखर कारखाना ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांची शिरूर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्वतःच्या हिमतीवर पुण्यामध्ये बसून पाच कारखाने चालविणे हे काही सोपे काम नाही. बंद साखर कारखाने सुरू करून त्यांचा कारभार चांगल्या पद्धतीने सुरू केल्यामुळे शेतकरी, कामगारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीत ओंकार ग्रुप द्वितीय क्रमांकावर असून, हा फक्त व्यावसायिक ग्रुप आहे. कर्मचारी, ऊस वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळेच खऱ्या अर्थाने हा दहा लाख साखरपोत्यांचा टप्पा यशस्वी पार केला. कारखान्याकडे तीनशे कोटी रुपयांचा साठा शिल्लक असल्याने शेतकरी, वाहतूकदार, कामगारांनी घाबरून जायचे काही कारण नाही. यावेळी टांझानियाचे माजी खासदार हसानंद मुर्जी, एम. एस. बँकेचे एमडी देशमुख, ओंकार ग्रुपचे सदस्य प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे- पाटील, रेखाताई बोत्रे-पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. यादव, सरपंच चिमाजी दरेकर, सरपंच सचिन चौधरी, हनुमंत मगर, अशोक सस्ते, किरण चव्हाण आदी उपस्थित होते. नवनाथ दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी बनसोडे यांनी आभार मानले.