सांगली : श्री-श्री सद्गुरू साखर कारखान्यासमोर मंगळवारपासून येथील कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांनी कुटुंबीयांसमवेत न्याय्य मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. वाघमारे कारखान्यामध्ये काम करत होते. कारखान्यातील आगीच्या दुर्घटनेत उंचावरून उडी मारल्याने त्यांच्या गुडघ्याला व मणक्याला इजा झाली. त्यामुळे ते सध्या काम करू शकत नाहीत. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. पत्नी, तीन अपत्ये व वृद्ध आई असा त्यांचा परिवार आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबाकडे कारखान्याने लक्ष दिले नाही.
वाघमारे यांनी सांगितले की, कारखान्याने आम्हाला आर्थिक मदत केलेली नाही. वाघमारे यांच्या शेतातील जागा कारखाना वापरत आहे. तर तालुकाध्यक्ष अमित वाघमारे यांनी सांगितले की, वाघमारे कुटुंबीयांना कारखान्याकडून त्रास दिला जात आहे. दरम्यान, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे यांना नोकरी देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. मात्र, त्यांच्या अधिकच्या मागणीसाठी तहसीलदारांसमवेत बैठक होणार आहे. त्यामध्ये यावर निर्णय ठरेल.