सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईला एक महिन्यांसाठी स्थगिती मिळाली आहे. संचालक मंडळ व चेअरमन अभिजीत पाटील यांनी स्थगिती मिळवली आहे. कारखान्यास मागील जुन्या संचालक मंडळाच्या काळातील थकीत कर्जाच्या वसुली कामी सरफेसी कायद्यांतर्गत जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या जप्तीच्या विरोधात कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने पुण्यातील डी. आर. टी. न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्यायालयात या अर्जावर ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जप्तीला न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली. कारखान्याच्यावतीने ॲड. सतीश तळेकर, ॲड. प्रज्ञा तळेकर व ॲड. एस. बी. खुर्जेकर यांनी काम पाहिले. दरम्यान, राजकीय वैमानस्य, द्वेष आणि विरोधापोटी ही कारवाई झाली आहे. आता मात्र न्यायालयातून स्थगिती मिळाल्याने कारखान्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. असे चेअरमन पाटील यांनी सांगितले.