‘दत्त-शिरोळ’चे चेअरमन गणपतराव पाटील ‘सहकार महर्षी’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेत शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना भारतीय शुगरतर्फे ‘सहकार महर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे भारतीय शुगर सिंपोजियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात नेशनल शुगर इन्स्टिट्युटचे संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून सन १९७५ मध्ये भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आली असून साखर कारखानदारीत येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यापर्यंत पोहोचावे. तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबळाला व्हावे, यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी परिषद आयोजित करून साखर कारखानदारीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारी बरोबरच शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, एकरी २०० टनाचे ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र, दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूने सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी केलेले प्रयत्न व शिरोळ परिसरात सुमारे साडेआठ हजार एकरावरील क्षारपडमुक्त जमीन अभियानाचे दत्त पॅटर्न या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

गणपतराव पाटील म्हणाले कि, दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम केले. प्रयोगशील शेती बरोबरच सहकारी संस्था व बँकांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक सहकारी संस्थांना मार्गदर्शन करता आले. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून यापुढेही सहकार क्षेत्रात सर्वाधिक काम करण्याचा प्रयत्न राहील. समारंभास भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, रणवीर शिंदे, एम. जी. जोशी यांच्यासह दत्तचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील तसेच संचालक मंडळ व दत्त उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here