पुणे : राज्यातील चार साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. राज्यात आतापर्यंत ७५१ लाख टन उसाचे गाळप आणि ७३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अजून एक ते दीड महिना उसाचा हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.तर येणाऱ्या काळात अजून दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन हे ९२५ लाख क्विंटल ते ९५० लाख क्विंटलच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कमी उसामुळे अनेक ठिकाणच्या कारखान्यांना एका महिन्याच्या आत गाळप थांबवावे लागणार आहे. मागच्या वर्षी ८२८.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि ८११ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तुलनेने यंदा ७७ लाख टन उसाचे गाळप आणि ७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. राज्यात ८ फेब्रुवारीअखेर ७५१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ७३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे दुष्काळी भागातील आणि पाणी कमी पडलेल्या उसाला फायदा झाला आहे. उसाच्या उत्पादनातही काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे.
राज्यात ३१ जानेवारी अखेर ५७०.११ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्याची एफआरपी १३ हजार २५९ कोटी रुपये होते. यापैकी १२ हजार ७८१ कोटी रुपये एफआरपी वाटप झाले आहे. एकूण ९६.३९ टक्के एफआरपी वाटप झाले असून थकबाकी ४७८ कोटी रुपये आहे. ९४ टक्के कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे. तर ११२ कारखान्यांकडे एफआरपीची देणे बाकी आहे.