जळगाव : खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आतापर्यंत या विभागात मागील आठवड्यापर्यंत सुमारे ११ लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. खानदेशात सहा साखर कारखाने सुरू असून सर्वाधिक तीन कारखाने नंदूरबार जिल्ह्यात आहेत.
धुळ्यात एक कारखाना असून रोज ६०० ते ७०० टन ऊस गाळप केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन खासगी व एक सहकारी साखर कारखाना सुरू आहे. लोणखेडा (ता. शहादा) येथील कारखाना सुरू होऊ शकला नाही. खानदेशात फक्त एकच सहकारी कारखाना नंदुरबारातील डोकारे (ता. नवापूर) येथे सुरू आहे. अन्य कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत.
खानदेशात सर्वाधिक सुंमारे सव्वासहा लाख टन ऊस गाळप समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने केले आहे. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील घोडसगा (ता. मुक्ताईनगर) व चहार्डी (ता. चोपडा) येथील कारखान्यांनी ऊस गाळप केले आहे. समशेरपूर येथील कारखान्याने यंदा १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. चोपडा व मुक्ताईनगर येथील कारखान्यांचे गाळप गतीने सुरु आहे.