सांगली : सांगली जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांनी ८२ लाख ४० हजार ८१२ मे. टन उसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत ८९ लाख ४२ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा कार्यक्षेत्रात मशिनची संख्या जास्त असल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होवू लागले आहे. मात्र हंगाम मार्च अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत राजारामबापू कारखान्याच्या जत युनीटचे गाळप बंद झाले आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यात ९९ लाख ६१ हजार टनाचे गाळप झाले होते. यावर्षीही सरासरी तेवढे गाळप होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या गाळपात कृष्णा साखर कारखान्याने तर उताऱ्यात राजारामबापू साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कृष्णा साखर कारखान्याने १०६ दिवसांत सर्वात जास्त ११ लाख १ हजार ११० टनांचे गाळप केले आहे. राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनीटचा साखर उतारा सर्वात जास्त १२.५५ टक्के आहे. राजारामबापू समुहाच्या चार युनिटचे मिळून १६ लाख ३५ हजार ६५५ टनाचे गाळप झाले आहे. हुतात्मा कारखान्याचे ४ लाख २० हजार ५३० मे. टन गाळप झाले असून साखर उतारा १२.४७ टक्के आहे. विश्वास कारखान्याचे ५ लाख ७ हजार ३७० मे. टन गाळप झाले असून ११.९७ टक्के साखर उतारा आहे.